Sharad Pawar News: राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. नागपुरात सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक परभणी आणि बीडच्या घटनांवरून फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.
शरद पवार यांनी आज देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमके काय घडले? याचाही त्यांनी माहिती घेतली. यावेळी शरद पवारांनी देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदार घेतली. शरद पवार म्हणाले की, देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतिगृहात शिक्षणासाठी पाठवून द्या, तिथे ९ हजार मुली शिकत आहेत. या मुलीचा कॉलेजपर्यंच खर्च मी करतो, तुम्ही काळजी करू नका, असे शरद पवार म्हणाले. तसेच त्यांनी देशमुख कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारीही घेतली. यावेळी खासदार निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री राजेश टोपे हे देखील त्यांच्यासोबत होते.
या घटनेने सर्वसामन्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. अशा जिल्ह्यात अशी घटना घडली. काहीच संबंध नसताना सरपंचाची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य आणि केंद्र सरकारने या घटनेची नोंद घ्यावी, असे शरद पवार हे देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर म्हणाले.
बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू चाटे या आरोपीने जिल्ह्यात पवनचक्की लावणाऱ्या ऊर्जा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती आणि मागण्या मान्य न झाल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती. संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून खंडणी थांबविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे कारमधून अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या