Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालापूर्वीच राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात त्रिशंकू विधानसभेच्या शक्यतेमुळं महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्ष सतर्क झाले आहेत. दोघांनीही विजयाचा दावा केला असला तरी, कोणत्याही परिस्थितीला तयार राहण्याची देखील तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची तातडीची बैठक घेतली आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. सर्व उमेदवारांनी आपला विजय जाहीर होताच तातडीने मुंबईत पोहोचावे, असे शरद पवार यांनी बैठकीत सांगितले.
शरद पवार यांनी सर्व उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व उमेदवारांना लोड घेऊ नका म्हणत महाविकास आघाडीच्या १५७ जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला देखील त्यांनी दिला. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका, जिंकल्यानंतर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला या अशा सूचना देखील शरद पवार यांनी उमेदवारांना केल्या आहेत.
मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाकडून हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस देखील आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.
इतकंच नाही तर अपक्षांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी शरद पवार यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. चुरशीची लढत असेल तर त्यांना एकत्र आणावे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उद्याच्या मंतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले आहेत. त्यांनी आपल्या अनेक नेत्यांना अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या छोट्या पक्षांच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: समविचारी बंडखोर नेत्यांच्या संपर्कात राहा असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. यावेळी मुख्यमंत्री आपलाच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. महायुती जिंकली तर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे कुणाचे सर्वाधिक आमदार निवडून येणार याकडे लक्ष लागून आहे. देवेंद्र फडणवीस राज्यभरातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पालघर, पश् चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती आहे.
स्वबळावर १०० जागा जिंकण्याची भाजपला आशा आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. परिस्थितीत काही अपक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने आपली ताकद वाढवण्यावर भाजपचा भर राहणार आहे. आपल्या आमदारांव्यतिरिक्त अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सुमारे सव्वाशे जागा मिळविण्याची भाजप नेत्यांची रणनीती आहे.