शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन; ‘अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता युगेंद्र पवारांना निवडून द्या’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन; ‘अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता युगेंद्र पवारांना निवडून द्या’

शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन; ‘अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता युगेंद्र पवारांना निवडून द्या’

Nov 18, 2024 06:37 PM IST

अजित पवार यांना मी एकदा नाही तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता बारामतीत नवीन पिढीला संधी देण्याची गरज असून युगेंद्र पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन शरद पवार यांनी बारामतीतील मतदारांना केलं.

युगेंद्र पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे शरद पवार यांचा बारामतीकरांना आवाहन
युगेंद्र पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे शरद पवार यांचा बारामतीकरांना आवाहन

अजित पवार यांना मी तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता बारामतीतून तरुण नेतृत्व देणे गरजे आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी आज केलं. बारामतीत सोमवारी सायंकाळी आयोजित निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत पवार बोलत होते. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, 'काही लोक सांगतात, आता मी काय करू? ही तशी गमतीचीच गोष्ट आहे. १९६७ साली तुम्ही मला पहिल्यांदा आमदार केलं. त्यानंतर मी मंत्री, मुख्यमंत्री झालो. नंतर बारामतीत नवी पिढी आणली पाहिजे असा विचार पुढे आला. मी अजित दादांना पुढे आणलं. २०-२२ वर्ष अजित पवार यांनी बारामतीचं प्रतिनिधीत्व केलं. मी त्यांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं. त्यांनी काम केलं. त्याबद्दल माझी तक्रार नाही. मग आता पुढं काय करायचं? जशी माझ्यानंतर अजित पवार यांची पिढी पुढे आली तशी युगेंद्र पवार यांची नंतरची पुढची पिढी आहे. बारामतीचं समाकारण, अर्थकारण सुधारण्यासाठी कुणी न कुणीतरी असण्याची गरज आहे.  युगेेंद्र यांनी मतदारसंघात गाव न गाव फिरून लोकांशी संपर्क केला आहे. ते लोकांचे प्रश्न समजून घेतात. देशात बारामतीचे नाव घेतले तर माझे नाव घेतात. ही परंपरा पुढे न्यायची असेल तर युगेंद्र पवारसारखी ज्ञानी पिढीची आवश्यकता आहे. तेव्हाच बारामतीचा नावलौकीक देशभरात जाईल. सर्वांशी चर्चा करून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. आता त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपस्थित बारामतीकरांना शरद पवार यांनी केलं. बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही ५० वर्ष काम केलं आहे. त्यापेक्षा अधिक जोमाने काम करण्याची हिंमत युगेंद्र पवारमध्ये असल्याचं शरद पवार म्हणाले.

एकीकडे लाडकी बहीण योजना तर दुसरीकडे महिला अत्याचारात वाढः शरद पवार

राज्यात सत्ताधारी महायुतीने ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे. परंतु दुसरीकडे महिला अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात ६७३८१ महिलांवर अत्याचार झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तर ६४ हजार मुली राज्यातून बेपत्ता झाल्याचे पवार म्हणाले. त्यामुली परत आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली असा सवाल पवार यांनी केला. राज्यात शेतीची दुरावस्था झाली असून २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पवार म्हणाले. शेतीमालाला किंमत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे ते म्हणाले. सरकार १६ उद्योगपतींचे १८ हजार कोटींचे कर्ज माफ करतं, मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

बारामतीत उद्योगधंदे मी आणलेः शरद पवार

मी मुख्यमंत्री झाल्यावर पुणे आणि बारामती, जेजुरी, लोणंद, इंदापूर, रांजणगाव परिसरात एमआयडीसी आणली. त्यामुळे या परिसरात हजारो तरुणांना रोजगार मिळाले अशी माहिती शरद पवार यांनी दिली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रातले टाटा एअरबस, वेदांत फॉक्सकॉनसारखे अनेक उद्योग गुजरातला गेल्याचे पवार म्हणाले. नरेद्र मोदी हे गुजरातचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र त्यांनी देशाचा कधीच विचार केला नाही. आता अशा लोकांच्या हातात सत्ता द्दायची का, याचा विचार मतदारांनी करावा, असं पवार म्हणाले.

Whats_app_banner