पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली पण त्यांना बहुमत होत का? पंतप्रधान मिळवण्यासाठी मोदींना तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं समर्थन घ्यावं लागलं. याआधी मोदी सरकार म्हटले जायचं, भारत सरकार म्हणत नव्हते. निवडणूक प्रचारातही 'मोदी की गॅरंटी' म्हणायचे, पण लोकांना मोदीची गॅरंटी नसल्याचं सिद्ध झालं. जनतेने मोदी सरकारला धुडकावलं आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली. अहमदनगरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
या मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शरद पवार म्हणाले की, राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना मर्यादा ठेवली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? की भटकती आत्मा. माझा उल्लेख त्यांनी भटकता आत्मा केला. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणासाचा आत्मविश्वास वाढला. मोदींनी शिवसेनेचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना असा केला. त्यांना हे बोलणे शोभतं का? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की, त्यांना तारतम्य राहिलेलं नाही.
जे झाले ते विसरुया. आपण नव्या विचाराने जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार करुया. ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावी लागेल. संघटना मजबूत करावी लागेल. समाजातील दलित वर्ग आहे, अल्पसंख्याकांचा वर्ग आहे, महिला वर्ग आहे, त्यांच्या हिताची जतन करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. हे करण्याचा पक्ष कुठला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हा इतिहास निर्माण करायचा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
या देशाचे लोक मोदी सारख्यांनी प्रश्न जे उपस्थित केले त्यांना फारसं महत्त्व देत नाहीत. निवडणुका जाहीर झाली तेव्हा लोकांमध्ये चर्चा होती की, राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं. आनंद आहे. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन. त्या ठिकाणी रामांचा सन्मान ठेवेन. पण राजकारणासाठी त्याचा कधी वापर करणार नाही. ते चुकीचं काम मोदींनी केलं. त्याची नोंदी अयोध्येच्या जनतेने घेतली व राम मंदिर असलेल्या अयोध्येतच मोदींच्या उमेदवाराचा शंभर टक्के पराभव केला. हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जसं बनलं होतं तसं महाराष्ट्राच्या जनतेचं अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील याची खात्री मी देतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सुदैवाने सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत. सुप्रिया यांची चौथी टर्म आहे, कोल्हे यांची दुसरी टर्म आहे. संसदपटू म्हणून सन्मान या दोघांना मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून राज्याचे, जिल्ह्याचे व मतदारसंघातील प्रश्न सोडवले जातील.