मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही आमदार आणता येत नाहीत, त्यांना..", पवारांची राज ठाकरेंवर जळजळीत टीका

"हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही आमदार आणता येत नाहीत, त्यांना..", पवारांची राज ठाकरेंवर जळजळीत टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 21, 2022 05:59 PM IST

हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले आमदार विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?", अशा शब्दात शरद पवार (Sharad pawar) यांनीराज ठाकरेंना (Raj Thackeray) सणसणीत टोला लगावला.

पवारांची राज ठाकरेंवर जळजळीत टीका
पवारांची राज ठाकरेंवर जळजळीत टीका

Sharad pawar on raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांनी मनसे व राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर मोजक्या शब्दांमध्ये जळजळीत टीका केली आहे. शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. “प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले आमदार विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?", अशा शब्दात शरद पवार यांनीराज ठाकरेंना सणसणीत टोला लगावला. ते मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावरून राज ठाकरेंचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येणं यावर एक प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार यांनी मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसं लक्ष देत नाही, असं म्हणून एकूणच राज ठाकरेंच्या दौऱ्याची आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांच्या कार्यक्रमाची खिल्ली उडवली.

ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच नंबर वन -

नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यातील ग्रामपंचायतीत मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर माहिती दिली. यात महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळाल्याचा त्यांना दावा केला. महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

पत्राचाळ घोटाळ्याबाबत प्रतिक्रिया -

शरद पवारांनी यावेळी पत्राचाळ घोटाळ्यावरुन गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबतही प्रतिक्रिया दिली. पत्राचाळी संदर्भात जी काही बैठक झाली त्याचा तपशील सर्व नमूद आहे. त्यावर तत्कालीन सचिवांची सही आहे. तरीही काही चौकशी करायची असेल तर ती लवकरात लवकर करा आणि सगळं खोटं ठरलं तर मग काय?", असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या