Sharad Pawar on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके' असे शहा म्हणाले होते. शहा यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शरद पवार यांनी शहा यांच्यावर पलटवार केला. 'सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे. देश कोणत्या दिशेनं चाललाय याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका पवार यांनी केली.
पुण्यात गेल्या आठवड्यात भाजपचा मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पाच हजार भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अमित शहा हजर होते. यावेळी त्यांनी भाषणात शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शहा म्हणाले होते की, भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजपा सत्तेत आली, त्यापाठोपाठ मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले, पाठोपाठ मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही ठरवा, असे अमित शहा म्हणाले होते.
छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात शुक्रवारी बोलतांना शरद पवार यांनी अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. अमित शहा यांच्या टीकेला त्यांनी चोख भाषेत उत्तर दिले. पवार म्हणाले, अमित शाह हे आता या देशाचे गृहमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका भाषणात म्हणाले होते शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. मात्र, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. केंद्रात जाणाऱ्यापूर्वी अमित शहा हे जेव्हा गुजरातमध्ये होते; तेव्हा त्यांनी कायद्याचा गैरवापर केला. या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकावी या हेतूने त्यांनी हे पाऊल उचलले होते. मात्र, हाच व्यक्ति आज देशाचा गृहमंत्री झाला आहे व त्याच्यावर देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असतांना अशी वक्तव्ये करत आहे.
संबंधित बातम्या