Sharad Pawar on Maharashtra Election : राज्यात आज सकाळी विधानसभा मतदार संघासाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले आहे. बारामती येथे अजित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. तर शरद पवार यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी मतदान केल्यावर राज्यात सत्ताबदल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. पण राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे चित्र दिसत आहे. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे. शरद पवार यांनी अजित पवारांचा महायुतीला बहुमत मिळण्याचा दावा खोडून काढला आहे.
शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पवार म्हणाले, महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात असून प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क बजावला हवा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६७ टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये ७५ ते ८० टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत राज्याने मागे राहणे योग्य नाही. त्यामुळे माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा. जो राजकीय पक्ष व उमेदवार योग्य वाटेल, त्यांना मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले.
विनोद तावडे यांच्या बद्दल देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, या प्रकरणाबाबत खऱ्या गोष्टी मला माहिती नाहीत. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. ज्यांच्यावर आरोप केला जातो, त्यांना मी थोडसं ओळखतो. माझ्याकडे खरी माहिती आल्याशीवाय मी यावर बोलणार नाही असे पवार म्हणाले.