सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकार तसेच पंतप्रधान मोदींना घेरलं आहे. आज महाविकासआघाडीकडून राज्य सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी मागितलेल्या माफीवर जोरदार निशाणा साधला.
मुंबईतील गेट वे वरील शिवाजी महाराजांचा पुतळा १९६० पासून उभा आहे. हा पुतळा समुद्राच्या बाजूला आहे, त्याला काही झालं नाही. मालवणातच का झालं?याचा अर्थ पुतळ्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नव्हता. काहीजण म्हणतात वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. गेट वे वरचा पुतळा का नाही कोसळला. कुवत नसणाऱ्याला काम सोपवलं गेलं. त्याचं उद्घाटन घाई घाईने करण्यात आलं,असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
मोदींवर निशाणा साधताना पवार म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींनी पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली, पण लगेच म्हणाले की, सावरकरांचा अपमान केला जातो, तेव्हा कुणी माफी मागत नाही. या दोन गोष्टींचा संबंध काय?शिवाजी महाराज व सावकरांची एकत्रतुलना होऊ शकते का?सावरकर स्वातंत्र्याची अनेक वर्ष तुरुंगात होते, पण तरी यांची तुलना महाराजांशी होऊ शकते का?असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहीत करतात एवढंच नव्हे तर अंगाशी आलं की मग माफी मागतात.
शरद पवार म्हणाले की, राज्यात तसेच देशातील मुस्लिम समाजाची स्थिती चिंताजनक आहे. त्यांच्यात दारिद्रय वाढतंय, शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. जातीय दंगे झाले तर सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा मतदानात सकाळी ७ वाजता मतदानाच्या रांगेत सर्वाधिक लोक लोक मुस्लिम समाजाचे होते. लोकशाहीची जबाबदारी म्हणून ते आले होते. मात्र ज्यांच्या पराभव झाला, ते लोक या समाजात जावून तुला काय मिळाले, असं विचारत आहेत. आपण त्यांना विश्वास द्यावा लागेल, असंही पवार म्हणाले.
राज्यातील महिलांनी साडी मागितली नव्हती, ना महिन्याला पैसे मागितले होते. त्यांची भावना आहे की, मोदींचं राज्य येऊन उपयोगाचं नाही. या सगळ्या वर्गाला वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या पाठीशी आहोत, तसे वातावरण आपण तयार केलं पाहिजे, असं शरद पवार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.