Sharad Pawar : अजित पवार गटातील आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे शरद पवारांचे संकेत; म्हणाले, ‘जे मदत करतील..’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : अजित पवार गटातील आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे शरद पवारांचे संकेत; म्हणाले, ‘जे मदत करतील..’

Sharad Pawar : अजित पवार गटातील आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे शरद पवारांचे संकेत; म्हणाले, ‘जे मदत करतील..’

Jun 25, 2024 06:46 PM IST

Sharad pawar : अजित पवार गटातील अनेक आमदार पुन्हा शरद पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता शरद पवारांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत येणाऱ्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले.

अजित पवार गटातील आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे शरद पवारांचे संकेत
अजित पवार गटातील आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे शरद पवारांचे संकेत

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. सुनिल तडकरेंच्या रुपात त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला.  याउलट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठी बाजी मारताना १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवला. यानंतर आता अजित पवार गटात चलबिचल सुरु असून अनेक आमदार पुन्हा शरद पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.याबाबत विचारले असता शरद पवारांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत येणाऱ्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले.

पुतण्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिले. जे आमदार संघटना बळकट करण्यास मदत करतील किंवा पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाहीत, अशा आमदारांना पक्षात घेतले जाईल, असे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ज्यांना पक्ष कमकुवत करायचा आहे, त्यांना घेतले जाणार नाही. पण जे नेते संघटना बळकट करण्यास मदत करतील आणि पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाहीत, अशा नेत्यांना घेतले जाईल, असे पवार म्हणाले. मात्र, तेही पक्षाच्या (राष्ट्रवादी-सपा) नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून होईल, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी आपले पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुन्हा राष्ट्रवादीत स्वागत केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. अजित दादांचा गट सध्या सत्ताधारी महायुतीसोबत आहे, ज्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा समावेश आहे.

जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि अनेक आमदार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी मध्ये फूट पडली. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि त्याला 'घड्याळ' चिन्ह दिले.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवारांच्या गटाच्या निराशाजनक कामगिरीनंतर शरद पवारांच्या गोटात संभाव्य पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चारपैकी केवळ एक जागा मिळाली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागा मिळाल्या.

सत्ताधारी महायुती आघाडीने राज्यातील ४८ पैकी १७ जागा जिंकल्या, त्यात भाजपने नऊ आणि शिंदे यांच्या सेनेच्या गटाने सात जागा जिंकल्या. सध्याच्या एनडीए सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने अजित पवारांचा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्याने त्यांच्यासाठी ही डिमोशन ठरेल, असे सांगून हा प्रस्ताव फेटाळून लावला.

ऑक्टोबर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शरद पवारांच्या गोटात परतणार असल्याच्या चर्चाही महत्त्वाच्या आहेत. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १८ ते १९ आमदार पक्षांतर करतील, असा दावा राष्ट्रवादी-सपाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या नेत्यांना स्वीकारण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या