मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केली. दरम्यान, जरांगे पाटील यांना बारामतीतून आदेश गेला असावा. त्यामुळे त्यांनी रणांगणातून पळ काढला असावा, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘मनोज जरांगे यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. यात महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध नाही. जसा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता तसाच निवडणूक न लढवण्याचा निर्णयही त्यांचाच आहे.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. मुंबईत पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बंडखोरांना समजवण्यात यश येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरांशी बोलत आहेत. आम्हाला कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत नको आहे, असं शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे, असं पवार म्हणाले. भाजपला आमचा विरोध आहे असं मनोज जरांगे सतत सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता, असं पवार म्हणाले.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रश्मी शुक्ला यांना हटवण्याचा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. त्यांचा कालावधी संपलेला होता. त्यांना हटवून निवडणूक आयोगाने राज्य सरकारला सणसणीत चपराक लगावलेली आहे. त्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. अशा व्यक्तीचा सेवा कालावधी वाढवून देऊन त्यांच्या कालखंडात निवडणूक घेण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता. त्यांना जर थोडी जरी नैतिकता असेल तर त्या राजीनामा देऊन या पदावरून कायमच्या पायउतार होतील, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीत ज्या-ज्या पक्षाचे अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्या आहेत. रायगड जिल्ह्यात उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आपला अर्ज मागे घेणार आहे. तर अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आपला अर्ज मागे घेणार असल्याची माहिती शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.