राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, यावर आता खासदार शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले की, झेड प्लस सुरक्षा पुरवण्याबाबत मला कोणतीही माहिती नाही, माझ्याकडे गृह विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी मला याबाबत सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला झेड प्लस सिक्युरिटी दिली आहे. मला ही सुरक्षा का दिली? याची अधिक माहिती घेऊ. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना ऑथेन्टिक माहिती मिळावी, म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी, अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी संवाद साधून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सुरक्षा घ्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. आजपासून सीआरपीएफचे ५५ जवान शरद पवारांसोबत असणार आहेत. नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे विविध जिल्ह्यात दौरे सुरू झाले आहेत. त्याचबरोबर ओबीसी व मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. काही महिन्यांपूर्वी शरद पवार मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, त्यांना केंद्राची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ५५ सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल.
Z Plusदर्जाची सुरक्षा काय असते?
यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये १० आर्म्ड स्टॅटिक गॉर्ड्स, २४ तास ६ PSO, २४ जवानांची दोन पथके आणि ५ वॉचर्स असतात. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार सीआरपीएफचे ५५ सशस्त्र जवानांची एक टीम पवारांच्या सुरक्षेत तैनात असणार आहे. केंद्राने पवारांना सीआरपीएफ वीआयपी सुरक्षा विंगची झेड प्लस कव्हर दिले आहे. सीआरपीएफची एक टीम या कामासाठी आधीपासूनच महाराष्ट्रात आली आहे. व्हीआयपी सुरक्षा सुरक्षेचे वर्गीकरण झेड प्लसपासून सुरु होते. त्यानंतर Z, Y, Y आणि X येतात.