अजित पवारांनी बंडखोरी करून पक्षातील काही आमदारांसह सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला बहाल करत शरद पवार गटाला नवं नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या या नवीन चिन्हाचंआज शरद पवारांच्या हस्ते रायगडावर अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते.
पक्षचिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी रायगड किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. रायगडावर शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाने जवळपास अशक्य करून ठेवलं आहे. हातामध्ये असलेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्या-राज्यांमध्ये फूट पाडण्यासाठी वापरली जात आहे. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे.
या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असं पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाच्या अनावरण कार्यक्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, ४० वर्षांनंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल. अजित पवारांमुळे शेवटी ४० वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच.