MPSC Pune Sharad Pawar : कृषी विभागाच्या २५८ जागा समाविष्ट करण्यासाठी तसेच आयबीपीएस व एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता थेट शरद पवार यांनी उडी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर स्वत: आंदोलनात विद्यार्थ्यांच्या बाजूने उतरणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. साठी त्यांनी सोमवारी रात्रीपासून पुण्यात आंदोलन सुरू केले आहे, मुलांच्या आंदोलनाची दखल शरद पवार यांनी घेतली आहे. त्यांनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तसेच मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत सरकारला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात सांगितलं आहे. शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, सरकार आता काय निर्णय घेणार या कडे मुलांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बैठक आयोजित केली आहे. ११ वाजत ही बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत आयोग परीक्षे संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आयबीपीएस परीक्षेला मोठ्या प्रमाणात मुले बसत असतात. रविवारी ही परीक्षा होणार आहे. याच दिवशी राज्यसेवा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ही तारीख बदलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील आयोगाशी चर्चा केली आहे. कृषी विभागाच्या २८५ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झाला नाही तर रविवारी दोन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा या बाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांशी बोलणी केली आहे. यावर आज बैठक असून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.