Sharad Pawar on Anil Deshmukh Attack : राज्यात विधानसभा प्रचाराच्या तोफा सोमवारी ६ वाजता थंडावल्या. यावेळी शेवटची प्रचार सभा आटपून परत जात असतांना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला असून रक्त वाहत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यांना तातडीने काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशमुख हे नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलला परत जात होते. यावेळी बेला फाट्यानजिक त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेवर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी ही या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली असून ही घटना निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी माघार घेत त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मुलगा सलिलच्या प्रचारासाठी अनिल देशमुख हे मैदानात उतरले होते. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे ते प्रचारात व्यस्त होते. सोमवारी संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा झाली. ही सभा संपवून ते कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या कारने काटोलला निवास्थानी परत जात होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात देशमुख हे गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे.
अनिल देशमुख यांच्या हल्ल्यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अनिल देशमुख व त्यांच्या मुलाला मतदार संघातून क चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हे काहींना सहन झाले नसून त्यातून हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. शरद पवार यांनी काही वृत्त वाहिन्यांना देखील मुलाखत दिली असून त्यात त्यांनी या घटणेचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी एक्सवर या बाबत पोस्ट देखील केली आहे. पवार म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली असून अनिल देशमुख व त्यांच्या मुलाला मतदार संघातून जसा प्रतिसाद मिळत आहे. हे काही प्रवृत्तीना सहन होत नाही. अनिल देशमुख यांच्या डोक्याला या हल्ल्यात लागलं असून त्यांच्या डोक्यामधून रक्त येत आहे. आरोप-प्रत्यारोप ठीक आहे. मात्र, अशा प्रकारचा हल्ला करणं हे अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो, असे एका वृत्त वाहिनीशी बोलतांना पवार यांनी म्हटलं आहे.
तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे पक्षाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्य म्हटलं आहे.