दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक, डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक, डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक, डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 09, 2025 09:26 AM IST

Rohit Pawar On Delhi Election Result: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया (PTI)

Rohit Pawar News: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. त्यानुसार राज्यातील विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागा जिंकून भाजपने दोन तृतीयांशहून अधिक बहुमत मिळवले असून आता २७ वर्षांनंतर येथे सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढे काम करुनही अरविंद केजरीवाल यांचा पराभवझाला, अशा शब्दात रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या. तर, आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा जिंकता आल्या. याशिवाय, काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. दिल्ली विधानसभेचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. दरम्यान, रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, ‘दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया साहेब यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठेही झाले नाही, असे डोंगराएवढे काम दिल्लीत उभे केले. तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचेच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय? याची भीती वाटते. या निकालाने विकास करावा की नाही? असा प्रश्न पडला तर तो चुकीचा ठरणार नाही! एकीकडे विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आणि यामुळे सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, याचे अधिक दुःख वाटते.’

पुढे रोहित पवार म्हणाले की, ‘गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा!’

दिल्ली विधानसभा आणि मिल्कीपूर विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष शनिवारी सायंकाळी होळीगेट येथे भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास भाजपने होळीगेट येथे जमून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय आणि मिल्कीपूर पोटनिवडणुकीतील विजयाचा जल्लोष केला.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर