मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : ...तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल! शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे इशारा

Sharad Pawar : ...तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल! शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे इशारा

Jun 03, 2024 04:00 PM IST

Sharad Pawar Letter to CM Shinde : दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर,महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाारा शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून दिला आहे.

शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Sharad Pawar Letter To CM Shinde : लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दुष्काळाबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी हे पत्र त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करत या मुद्द्यावर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, अशा थेट इशाराही मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्यजनतात्रस्त झाली आहे. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर,महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल ! त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी,ही अपेक्षा,'असं शरद पवार हे पत्र शेअर करताना म्हटले आहेत.

शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की,मागील महिन्यात२४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन मी महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अध्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

मागील१०दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवडी सारखी महत्त्वाची धरणे आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक जळगाव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला,बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत,आटपाडी या तालुक्यांतील पाणीटंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

मागील वर्षी राज्यात केवळ ११०० टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्य शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

 

दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत, हे दुर्देवाने नमूद करावेसे वाटते.

टी-२० वर्ल्डकप २०२४