ajit pawar on sharad pawar : २०१९ मध्ये निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची बंद दाराआड चर्चा सुरू होती. या बैठीकील उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित होते, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह शरद पवार देखील उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या सांगण्यानुसार भाजपसोबत गेलो असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अजित पवार यांनी हा दावा केला आहे.
२०१९ मध्ये अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन करत पहाटे घेतलेल्या शपथविधीवर पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. अजित पवार म्हणाले, ५ वर्षापूर्वी काय घडले, कुठे बैठक झाली, त्यात कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. या बैठकीत अमित शाह होते, गौतम अदानी होते, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस मी स्वतः आणि शरद पवारसाहेबही बैठकीत होते. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने जे शरद पवार सांगतात तेच आम्ही करत होतो असा दावा देखील अजित पवार यांनी या मुलाखती केला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार ८० तास टिकले कारण शरद पवारांनी पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार बनवलं.
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज कुणालाही लावता येत नाही. जगातील कोणतीच व्यक्ती त्यांच्या बद्दल भाकीत वर्तवू शकत नाही. यात ना माझी काकू, ना सुपिया देखील शरद पवार काय करतील ? कधी कसे वागतील हे सांगू शकत नाही.
अजित पवार यांच्या अदानींच्या दाव्यावर राज्यसभेच्या खासदार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने दिलेल्या मुलाखतीनुसार, गौतम अदानी हे त्या बैठकीत उपस्थित होते, ज्यात महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणण्यासाठी संभाव्य आघाडीबाबत चर्चा केली जात होती. यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. ते भाजपचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? युती ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे का? महाराष्ट्रात भाजपला कोणत्याही किंमतीवर सत्तेवर आणण्यात एक उद्योजक एवढा रस का दाखवत आहे? असे त्या म्हणाल्या.
या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी अशा कोणत्याही बैठकीची माहिती नसल्याचं सांगितले. अजित पवार यांनी त्यांच्या मुलाखतीत ज्या भेटीचा उल्लेख केला, त्याबद्दल मला अजिबात कल्पना नाही, असे सुळे म्हणाल्या.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, काँग्रेसने अदानी यांच्यावर मोदी सरकारशी जवळचे संबंध असल्यावर टीका केली आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला शरद पवारांबद्दल कोणताही वाद नको आहे, त्यामुळे काँग्रेसने अजित पवार यांच्या या व्यक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भाजपने देखील अजित पवार यांच्या या दाव्यावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अजित पवार यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत ही भेट २०१९ ला नाही तर २०१७ मध्ये झाली होती, असा दावा या नेत्याने केला आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. तर केंद्रात भाजपचे सरकार होते.