आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ जित पवार गटाला बहाल केले आहे. यामुळे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह शरद पवार गटाला वापरता येणार नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या पक्ष कार्यालयावरील निवडणूक चिन्ह हटवण्यात येत आहेत. दरम्यान चिन्ह हटवताना पुण्यातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावूक झालेले पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर याचे पडसाद अनेक शहर कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर राज्यातील कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे. बुधवारी पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं. यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना त्यांना अश्रु अनावर झाले. जगताप यांनी आपल्या गाडीवरील सुद्धा घड्याळ चिन्ह कढून टाकले. यावेळी जगताप म्हणाले की, गेल्या २४ वर्षापासून कार्यालय पाहत असताना असेही दिवस येतील की, कार्यालयावरील चिन्ह काढावे लागेल, असे वाटलं नव्हतं.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कार्यालयावरील चिन्ह काढण्यात आल्यानंतर नाव देखील काळ्या कापडाने झाकण्यात आला आहे.
पक्ष कार्यालयातील अजित पवारांच्या नावाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या गटाचा कार्यकर्ता जाब विचारण्यासाठी आला होता. यावरून अजित पवार गट उपाध्यक्ष दत्ता सागरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर तेथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.