Onion Export Ban to Continue Till March 31: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र, त्यांचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी आज सकाळी ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील असे स्पष्ट केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
कांदा निर्यात बंदी उठवली गेली असे सगळीकडे बोलले जात आहे. पण सत्य परिस्थिती पाहता कांदा निर्यात बंदी उठवली गेलेली नाही, व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा अशा शब्दात जयंत पाटलांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
कांदा निर्यात बंदीवरून जयंत पाटलांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!"
देशातील सर्वात मोठी घाऊक कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये त्याची घाऊक किंमत १९ फेब्रुवारीला ४०.६२% ने वाढून १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल झाली, जी १७ फेब्रुवारीला १ हजार २८० रुपये प्रति क्विंटल होती. कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ३१ मार्च २०२४ च्या आधीच जाहीर केलेल्या मुदतीपर्यंत त्याच्या निर्यातीवर बंदी कायम राहील, अशी माहिती रोहित कुमार सिंह यांनी दिली. कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
संबंधित बातम्या