sharad pawar on Akshay Shinde Encounter : बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलिस चकमकीत मारला गेला आहे. अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला असून या एन्काऊंटरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटरर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, कॉँग्रेसने देखील या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करत धारेवर धरले आहे. तर शरद पवार यांनी देखील या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तळोदा कारागृहातून चौकशीसाठी नेले जात असतांना वाटेत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. या याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे, असे पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
बदलापूर घटनेवर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली. मात्र, आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
बदलापूर येथे एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या साठी बदलापूर येथे मोठे आंदोलन नागरिकांनी केले होते. या आंदोलनांना हिंसक वळण प्राप्त झाले होते. नागरिकांचा रोष पाहून सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली होती. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी सायंकाळी ६ च्या सुमारास अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन चौकशीसाठी घेऊन जात असतांना गाडीत अक्षय शिंदे याने शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अक्षयने सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कंबरेवरून बंदूक काढून नीलेश मोरे यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळ्या इतरत्र गेल्या. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर देत व स्वसंरक्षणार्थ त्यांच्या बंदुकीतून अक्षय शिंदेवर काही गोळ्या झाडल्या. यात अक्षय शिंदे जागीच ठार झाला.