Sharad Pawar on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती येथे एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टीका केली. याच सोबत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबद्दल देखील त्यांनी भाष्य केले.
अजित पवार यांच्यावर टीका करतांना शरद पवार म्हणाले, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. मात्र, असे असले तरी नागरिकांना सत्य काय आहे हे माहिती आहे. जनता ही आमच्याबरोबर आहे. त्यामुळे भावनिक आवाहन करण्याची गरज आम्हाला नाही. बारामतीचा मतदार सुज्ञ असून योग्य तो योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे असे देखील पवार म्हणाले.
निवडणूक आयोगावर टीका करतांना आयोगावर टीका करतांना शरद पवार म्हणले, राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात काहीजण पक्ष सोडून जातात, ही प्रक्रिया चालू राहते. मात्र, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला असे देशात कधीच घडले नाही. नुसता पक्षच दिला नाही तर खूण, चिन्ह सुद्धा दिले. हा निर्णय कायद्याला धरून आहे असे, वाटत नाही या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा हा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती, असेही पवार म्हणाले.
पवार म्हणाले, राजकारणात खूण किंवा चिन्ह गेल्याने फारसा फरक पडत नाही. या बाबत चिंता करण्याचे देखील कारण नाही. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या. त्यातील पाच निवडणुका या वेगवेगळ्या चिन्हावर लढवल्या. आधी बैलजोडी नंतर गाई वासरू नंतर चरखा, हात आणि मग घड्याळावर निवडणूक लढवली. त्यामुळे जर एकदा संघटनेची खूण काढून घेतली तर त्या संघटनेचे अस्तित्व संपतं असे नाही.
बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, याबाबत शरद पवार यांना विचारले असताना, लोकसभा निवडणुकीसाठी कोणीही उभे राहू शकतं, असे पवार म्हणाले.