देशाचे नाव इंडिया ऐवजी केवळ भारत करण्यावरून देशभर रणकंदन माजले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र सरकारकडून याचे उत्तर देण्यात आलेले नाही. आजच संपलेल्या जी२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवरून या वादाला सुरूवात झाली होती. तसेच परिषदेमध्ये मोदींसमोर लावलेल्या देशाच्या नेमप्लेटवर इंडिया ऐवजी भारत लिहिल्याने या चर्चांना हवा मिळाली आहे. यावर आता शरद पवारांनी टोला लगावला आहे.
विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडी नावानंतर केंद्र सरकारने जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत', असा केला होता. यावरून देशाचे नाव इंडिया बदलून भारत असं केलं जात आहे का? असा वाद निर्माण झाला आहे. यावरच बोलताना वाय बी सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, तुम्ही इंडिया या नावाने किती योजना काढल्यात? बरं आता नाव बदलल्यावर गेट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काय म्हणायचं. समाजाच्या महत्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी व समस्येपासून लक्ष वळवण्यासाठी असे मुद्दे उकरून काढले जातात. हाच दृष्टिकोन सध्याच्या राज्यकर्त्यांचा आहे. यामुळेच देशाचे नाव बदलण्याचा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षावर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. आपल्या उत्तरात शरद पवार गटाने अजित पवारचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच मौन सोडत अजित पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार यांनी घातलेली भूमिका विरोधाभासी आहे. त्याच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही.
संबंधित बातम्या