Sharad Pawar Visit Markatwadi : सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावानं ईव्हीएम विरोधात आवाज उठवताना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. अंगावर गोळ्या झेलू पण मतदान बॅलेट पेपरवरतीच घेऊ, असा निर्धार गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनानं त्यांना असं करण्यापासून रोखलं होतं. गावात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. पण आता मारकटवाडीच्या ग्रामस्थांनी पेटवलेल्या या आगीचा आता वणवा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उद्या मारकडवाडीला भेट देणार आहेत. तसेच लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील मारकडवाडीला भेट देणार असून या गावात ते लाँगमार्च काढणार आहेत.
शरद पवार यांनी उद्या (रविवार) मारकडवाडीत जाणार असल्याची घोषणा केलीय. ग्रामास्थानी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करुन पाहिलं तर बिघडलं कुठे,ग्रामस्थांवर बंदी घालण्याचं कारण काय?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत शरद पवार मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटूनत्यांच्याशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत.
शरद पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार आहोत. मी १४ निवडणुका लढलो कधी पराभव पाहिला नाही. आज लोक अस्वस्थ आहेत. महायुतीच्या विजयानंतरही लोकांमध्ये उत्साह का दिसत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधानसभेची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी येथे बंदी घालण्याचं कारण काय?त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही त्यागावातील लोकांचं काय म्हणणं आहे, हे समजून घेणार आहोत. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत.
शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निकालाची चिरफाड केली. शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत ७२ लाख मतं मिळाली, मात्र आमचे केवळ १० आमदार निवडून आले. अजित पवारांना ५८लाख मतं आहेत, त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. ८०लाख मत मिळालेल्या पक्षाचे १६ तर ७९ लाख मतं मिळालेल्या पक्षाचे५७आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत,असं शरद पवार म्हणाले.