Pawar Family Diwali Padwa in Baramati: दरवर्षी पवार कुटुंबीय हे एकत्र दिवाळी पाडवा साजरा करत असतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबियांचा पाडवा हा दुभंगलेला दिसला. पक्ष फुटला तरी पवार कुटुंबीय पाडवा एकत्र साजरे करतील असे कार्यकर्त्यांना वाटले होते. पण, शरद पवार यांनी हेममी प्रमाणे बारामती येथील गोविंद बागेत कार्यकर्त्यांशी भेटी गाठी घेऊन दिवाळी पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीत कार्यकर्त्यांची व समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन दिवाळी पाडवा साजरा केला आहे. दरम्यान, या ठिकाणी देखील दोन्ही पवार निवडणुकीचा डाव टाकून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतांना दिसले.
बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी पाडवा साजरा करतात. या दिवशी पवार कुटुंबीय गोविंदबागेत एकत्र येऊन राज्यभरातून येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेतात व शुभेच्छा देतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच ही परांपारा मोडीत निघाली आहे. पक्ष फुटल्या नंतर यावर्षी शरद पवार व अजित पवार यांचा दिवाळी पाडवाही वेगवेगळा झाला आहे.
दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये समर्थकांशी भेटीगाठी सुरु केल्या असून त्यांनी आज पत्नी खासदार सुनेत्रा पवार व इतर कुटुंबीयांसह व्यासपीठावर त्यांच्या समर्थकांच्या भेटी गाठी घेत शुभेच्छांचा स्वीकार केला. आज सकाळपासून अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटीसाठी मोठी रंग लावली होती.
तर बारामती येथील गोविंद बागेत देखील पवार यांनी दिवाळी पडव्या निमित्त दरवर्षी प्रमाणे स्नेहमेळावा घेत राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची भेट घेतली. गोविंद बागेची ही परंपरा यावर्षी मात्र, दुभंगलेली दिसली. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अजित पवारांनी दिवाळी पाडवा हा पहिल्यांदाच वेगळा साजरा केला आहे. गोंविद बागेत मोठी गर्दी केलीय. राज्यभरातील कार्यकर्ते बारामतीत दाखल होत आहेत. या पाडव्याला शरद पवार यांच्यासोबतच बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि शरद पवार हे या कार्यक्रमात लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत.
बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांना कितपत आव्हान देणार हे लक्ष्यवेधी ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते तीन ते चार दिवस बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
दिवाळी पाडव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या सध्या दिवाळीचा सण असून आपण दिवाळी साजरी करूयात. घरं फोडणे, पक्ष फोडणे असले उद्योग दिल्लीची अदृश्य शक्ती करते. त्यामुळे हे सगळं दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे यश आहे, असे सुळे म्हणाल्या.