BJP MP Girish Bapat Passed Away : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळं आता राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी गिरीश बापट यांच्या निधनामुळं दु:ख व्यक्त केलं आहे. याशिवाय बापटांच्या आठवणी जागवत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट यांच्या पार्थिव शरीरावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
आजाराशी झुंजत असतानाही बापटांनी पक्षाला उर्जा दिली- मुख्यमंत्री
खासदार गिरीश बापट हे दीर्घ आजाराशी झुंज देत असताना देखील त्यांनी भाजपाला उर्जा देण्याचं काम केलं. त्यांना जेव्हा भेटायचो तेव्हा त्यांना अनेक विषयांची माहिती असल्याचं पाहून चकीत व्हायचो. काही दिवसांपूर्वीच विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. नगरसेवकापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकिर्द आमदार, मंत्री आणि खासदार पदापर्यंत गेली. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विकासाच्या दृष्टीनं देखील त्यांनी मोठं योगदान दिल्याचं सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सर्वपक्षीय जनसंपर्क असणारा नेता गमावला- शरद पवार
पुण्याचे खासदार गिरीश बापटांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बापटांनी पक्षभेदांपलीकडे समाजकार्य केलं- अजित पवार
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन हे पुण्यातील सर्वपक्षीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. पुण्यासह महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि सुंसस्कृत चेहरा म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहिलं जायचं. गिरीशभाऊंनी जाती-पाती आणि पक्षभेदांच्या भिंती ओलांडून विकासाचं राजकारण केल्याची भावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
बापटांच्या निधनामुळं भाजपाचं मोठं नुकसान- पाटील
गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या चुकीच्या ठरतील, असं वाटत होतं. परंतु दुर्दैवानं त्या बातम्या खऱ्या ठरल्या. गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळं पुण्याचं, महाराष्ट्राचं आणि भाजपाचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे
संबंधित बातम्या