Pune Shanivar wada : पुण्यात अनेक वारसास्थळे आहेत. यातील शनिवार वाडा हे सर्वांचे पर्यटनस्थल आहे. मात्र, आता पुण्याचा ऐतिहासिक साक्षीदार असणारा हा वाडा दत्तक दिला जाणार आहे. या बाबत केंद्रीय पुरातत्व विभागाने निर्णय घेतला आहे. शनिवार वाड्यासोबतच पुण्यातील आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण्या यासह पाच प्राचीन पुरातत्त्वस्थळे ही दत्तक दिली जाणार आहेत.
केंद्रीय पुरातत्व विभागाने देशभरातील प्राचीन स्मारके, पुरातत्त्व स्थळांच्या संवर्धनासासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने एक महत्वाकांशी योजना जाहीर केली आहे. 'अॅडॉप्ट अ हेरिटेज' असे या योजनेचे नाव या अंतर्गत देशातील नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्था व वारसा स्थळांच्या सवर्धनासाठी कार्यरत संस्थांना या वास्तूंच्या देखभाल करता येणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित तब्बल ३ हजार ६९६ वारसा स्थळे आहेत. यात प्राचीन स्मारके, मंदिरे आणि काही धार्मिक स्थळे व ऐतिहासिक आहेत. वारसास्थळ दत्तक योजनेत सुरुवातीला देशातील ६६ वारसा स्थळे ही विविध संस्थांना दत्तक दिली जाणार आहेत.
वारसास्थळे दत्तक घेण्यासाठी दत्तक घेणाऱ्या संस्थांना पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. दरम्यान, वारसा स्थळ दत्तक घेण्यासाठी संबंधित संस्था- कंपनी यांच्यासोबत दत्तक करारपत्र करावे लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.asipermissionportal.gov.in या संकेत स्थळावर त्यांचे प्रस्थाव सादर करावे. यानंतर एक समिटी आलेल्या प्रस्तावाचे मूल्यांकन करून त्यांना मान्यता दिल्यावर पाच वर्षांचा करार संबंधित कंपनी अथवा संस्थेबरोबर करणार आहे.
या योजनेनुसार ज्या संस्था अथवा कंपन्या या वास्तु दत्तक घेतील त्यांच्यावर वस्तूची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्थापन व इतर जबाबदऱ्या राहणार आहेत. राज्यातील रायगड जिल्ह्यातील घारापुरी लेणी या पूर्वी पाच वर्षांसाठी दत्तक देण्यात आली आहेत. शनिवारवाडा व पुण्यातील इतर वारसा स्थळे या योजने अंतर्गत दत्तक दिले जाणार असून अद्याप या साठी कोणत्याही संस्थेने अर्ज केलेल्या नाही, अशी माहिती पुरातत्व विभाग मुंबईचे अधीक्षक शुभा मुजुमदार यांनी दिली आहे. पुण्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी या संवर्धनासाठी दत्तक दिले जाणार आहे.