Sangli gas leak : सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत अचानक वायु गळती झाली. या वायुगळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर ७ जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा कामगार कंपनीत काम करत होते. वायुगळती झाल्यावर ९ जण बेशुद्ध झाले. त्यातील ७ जणांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना दोन महिलांचा मृत्यू झाला.
मिळलेय माहितीनुसार सुचिता उथळे (वय ५०, रा. येतगाव), नीलम रेठरेकर (वय २६, रा. मसूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. गंभीर असलेल्या इतर पाच जणांची नावे समजू शकली नाही. त्यांच्यावर कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कशी झाली याचा शोध पोलिस घेत आहेत.
या घटनेचे वृत्त असे की, शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत अचानक गॅस गळती झाली. ही बाब सुरुवातीला लक्षात आली नाही. यामुळे अचानक कंपनीत काम करणारे ९ कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाली. यामुळे कंपनीत मोठा गोंधळ निर्माण झाला. कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने या सर्वांना कराड येथील सह्याद्री व श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सात जणांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना दोन महिलांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी कंपनीला भेट दिली. नेमकी ही घटना कशी घडली याची माहिती घेतली जात आहे. ही गळती थांबली असून पुढील धोका टळलेला असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. ही वायुगळती नेमकी कशामुळे झाली याच तपास केला जाणार असल्याचे देखील कंपनीने सांगितले.