ShaktiPeeth Expressway : शक्तीपीठाला मुख्यमंत्र्यांची 'ताकद'; महामार्गाचे काम सुरू करण्याचे फडणवीसांचे निर्देश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ShaktiPeeth Expressway : शक्तीपीठाला मुख्यमंत्र्यांची 'ताकद'; महामार्गाचे काम सुरू करण्याचे फडणवीसांचे निर्देश

ShaktiPeeth Expressway : शक्तीपीठाला मुख्यमंत्र्यांची 'ताकद'; महामार्गाचे काम सुरू करण्याचे फडणवीसांचे निर्देश

Jan 13, 2025 09:06 PM IST

Shaktipeeth Mahamarg : राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Devendra fadnavis on shaktipeeth highway : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिगृहण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर या महामार्गाचा प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचेही सरकारने म्हटले होते. मात्र निवडणुका पार पडताच आता शक्तीपीठाने डोकं वर काढलं आहे. राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचे काम सर्वांना विश्वासात घेऊन सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जेदार व व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृह राज्य सरकारच्या ६ विभागांच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्यात आली होती. या बैठकीत आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन करून सुरुवात करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर समाज कल्याण, पर्यटन, शालेय शिक्षण, पणन यासारख्या महत्त्वाच्या विभागांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण  तसेच विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा पाळण्यात येणार असल्याचे सांगितले.

काय आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प -

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हा महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याची घोषणा २०२३ मध्ये तत्कालीन शिंदे सरकारने केली होती. गोवा ते नागपूर ८०२ किमी अंतराचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील तीर्थस्थळांना जोडणारा आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग व्यापार व दळणवळणासाठी महत्वाचा आहे.

 

उद्योग -व्यवसायाच्या संधीसह राज्याच्या पर्यटनाला गती मिळणार आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर अशा राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या