मान्सून बरसू लागताच धबधबे नदी-नाले ओसंडून वाहू लागतात. निसर्गाचे हे आल्हाददायक रुप पाहण्यासाठी अनेक जण मग पिकनिकचे बेत आखू लागतात. मात्र अति उत्साहीपणामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडतात. धबधबे व नदी, तलाव आदि ठिकाणी अपघाताच्या बातम्या येऊ लागतात. अशीच एक घटना शहापूर तालुक्यातील पिवळीखोर गावात समोर आली आहे. येथील जंगलात असणाऱ्या धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जंगलात ही घटना घटना घडली. वाशिंद पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
धनंजय गायकवाड(मुरबाड) आणिकार्तिक रेड्डी(आंध्रप्रदेश) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुरातील खोर गावाच्या धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक तरुण मुरबाड तालुक्यातील आहे तर दुसरा तरुण आंध्र प्रदेशातील आहे. घटनेनंतर घटनास्थळी वाशिंद पोलिस व जीवरक्षक टीमचे सदस्य दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह धबधब्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
शहापूर तालुक्यातील पिवळी खोर गावाच्या हद्दीतील जंगलात काही तरूण धबधब्यावर गेले होते. धबधब्यात अंघोळ करत असताना त्यातील दोघांचा तोल गेल्याने त्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. संध्याकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.