Badlapur Rape Case: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले रेल्वे रोको आंदोलन मोडीत काढण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती फेटाळून लावत रेल्वे स्थानकावर दगडफेक केल्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून शेकडो आंदोलकांना पांगवले. आंदोलकांच्या रेल्वे रोको आंदोलनामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून बाहेरील गाड्यादेखील वळवण्यात आल्या.
मुंबई महानगर प्रदेशातील मध्य रेल्वे मार्गावर अनेक महिलांसह आंदोलक दिवसभर रुळावर ठाण मांडून राहिल्याने लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. लोकल वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती. त्यांनी शाळेच्या अटक केलेल्या शिपायला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अखेर सायंकाळी सहानंतर बदलापूर स्थानकातील रुळ आंदोलकांपासून मुक्त करण्यात आले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी तोडफोड केलेल्या रेल्वे स्थानक आणि शाळेवर पोलिस आणि आरपीएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. शाळेतील संतप्त पालक आणि अनेक महिलांसह स्थानिक नागरिकांनी मंगळवारी सकाळी शाळेबाहेर जमून रेल्वे स्थानकावर 'रेल रोको' आंदोलन केले. सकाळी साडेआठवाजल्यापासून लोकलचा मार्ग रोखून धरला.
त्यानंतर महिलांसह काही आंदोलकांनी शाळेचे गेट, खिडक्यांच्या काचा, बेंच आणि दरवाजे तोडून मालमत्तेचे नुकसान केले. आंदोलनादरम्यान रेल्वे स्थानकावर काही आंदोलकांनी दगडफेक केली. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर साडेतीन तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी पत्रकारांना दिली.
दोन महिलांसह तीन पोलिस अधिकारी सर्वंकष तपासासाठी सर्व पुरावे गोळा करत आहेत. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरणे किंवा निदर्शने करणे टाळावे, कारण अशा कृतींमुळे तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असे आवाहन पठारे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पूर्णपणे कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा बंदमुळे जमावबंदीचे आदेश असल्याने तपासाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
एफआयआर दाखल करण्यास १२ तास उशीर झाल्याचा आरोप डीसीपींनी फेटाळून लावला. रात्री साडेअकरा वाजता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आणि पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली. तीन ते चार वर्षे वयोगटातील अल्पवयीन पीडितांकडून माहिती गोळा करण्याच्या गुंतागुंतीमुळे गुन्हा दाखल होण्यासाठी लागणारा वेळ वाढला, असा दावा त्यांनी केला.