Pune Zika Virus: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून झिका विषाणूच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यात आणखी सात नव्या रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील झिका रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहचली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे संसर्ग पसरवणाऱ्या एडिस डासाच्या चाव्यामुळे झिका विषाणूचा प्रसार होतो, असे सांगण्यात येत आहे.
पुण्यात २ जुलै २०२४ रोजी ५५ वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पुण्यातील झिका विषाणूच्या रुग्ण सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत पुण्यातील रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. झिका विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना गर्भवती महिलांची तपासणी आणि त्यांची विशेष काळजी घेण्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
डासांमुळे पसरणारा हा विषाणू युगांडामध्ये १९४७ मध्ये रीसस मकाक माकडामध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आणि त्यानंतर १९५० च्या दशकात इतर आफ्रिकन देशांमध्ये मानवांमध्ये संसर्ग आणि रोगाचा पुरावा मिळाला. हा संपूर्ण जगात पसरला आहे आणि वारंवार होणारा संसर्ग आहे. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे गर्भात मायक्रोसेफली होऊ शकते. मनपाआरोग्य विभागाकडून पाळत ठेवली जात आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून धूरफवारणीसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूची लक्षणे सूचीबद्ध केली आहेत. विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. सामान्यत: संसर्गानंतर ३ ते १४ दिवसांनंतर लक्षणे दिसायला सुरूवात होते. रुग्णांना पुरळ, ताप, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतो. ही लक्षणे सहसा सुमारे दोन ते सात दिवस टिकतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा.