Set Result update : राज्यात प्राध्यापक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकालात ७ हजार २७३ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ते आता सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरले आहे. एकूण निकालाची टक्केवारी ही ६.६६ टक्के लागली आहे.
राज्यातील साहायक प्राध्यापक भरतीसाठी सेट ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. सेट किंवा नेट परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना सहायक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करता येतो. वर्षातून दोनवेळा ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान, सोमवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सेट निकालाची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. सोमवारी ३९वी सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ही परीक्षा ७ एप्रिलला राज्यातील १७ शहरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. तब्बल १ लाख ९ हजार २५० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. दरम्यान, या परीक्षेसाठी एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यमुळे काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास देखील विद्यापीठाला उशीर झाला.
सेट परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला आहे. https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी लॉग इन करून त्या ठिकाणी बैठक क्रमांक टाकून हा निकाल त्यांना पाहता येणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. या सोबतच या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.