Ujjwal Nikam to be special public prosecutor in Badlapur case : दहशतवाद आणि बलात्कारासारखी अनेक मोठे खटले हाताळून आरोपीना कठोर शिक्षा देणारे वरिष्ठ वकील उज्वल निकम यांची बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेचा जलद गतीने तपास करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उज्वल निकम यांनी या पूर्वी अनेक महत्वाचे खटले लढवले आहेत. त्यांनी आतापर्यंत ६२८ आरोपींना जन्मठेप आणि ३७ जणांना फाशीची शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम हे बदलापूर खटल्यात सरकारच्या वतीने बाजू मांडणार आहेत. खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की, बदलापूरमधील दुर्दैवी घटनेचा त्वरीत तपास केला जाईल आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल,असे एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या भक्कम युक्तिवादाने त्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फासावर नेले. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी असलेल्या कसाबला नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने उज्ज्वल निकम यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी यावर्षी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून सत्ताधारी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अतितटीच्या लढतीत पराभव केला.
दरम्यान, मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेतील दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर धडक देत रेल रोको आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी शाळा, स्थानक आणि पोलिसांवर दगडफेक करत हिंसक आंदोलन केले होते. रात्री पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत त्यांना पांगवले व आंदोलन चिरडले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास १२ तास लावल्याने तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करेल, असेही त्यांनी जाहीर केले.