Satish Nandgaonkar death News : ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान टाइम्सचे वरिष्ठ संपादक सतीश नांदगावकर यांचं बुधवारी निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. सतीश यांच्या पश्चात आई, पत्नी आणि १३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याीतील बाळकूम स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सतीश नांदगावकर हे दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात होते. जानेवारी २०१५ ते २०१६ च्या अखेरीस त्यांनी द हिंदूच्या मुंबईच्या ब्युरोचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. त्याशिवाय मुंबई मिरर, द टेलिग्राफ, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्स्प्रेस आणि द इंडिपेंडंटसह विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. असोसिएटेड प्रेस, हॉरिझोन्टल पोर्टल, Indya.com सोबत काही काळ त्यांनी स्ट्रिंगर म्हणूनही काम पाहिलं.
पत्रकारिता करतानाच सतीश नांदगावकर फिल्म सोसायटीच्या कार्यात सक्रिय होते. मुंबईतील सर्वात जुनी फिल्म सोसायटी आणि थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मीडिया फाउंडेशन ऑफ इंडियाचे ते सहसंस्थापक होते. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शौकीन असलेले सतीश नांदगावकर यांना फोटोग्राफीचीही आवड होती. भारतीय फोटो पत्रकारांसाठी तीन राष्ट्रीय-स्तरीय छायाचित्र स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
हिंदुस्तान टाइम्सचे ठाणे आणि नवी मुंबई ब्यूरो प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी रिअल इस्टेट आणि विमान वाहतूक क्षेत्राचं वार्तांकन केलं. गुन्हेगारी, कायदा, शिक्षण, राजकारण, नागरी समस्या, सिनेमा आणि संगीत यासह विविध क्षेत्राचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. शांत, सुस्वभावी आणि सौम्य प्रकृतीच्या सतीश यांच्या निधनामुळं पत्रकारिता क्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.