तब्बल तीन दशकांपेक्षा जास्त काळ विविध राष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्रं, साप्ताहिक आणि डिजिटल पोर्टलसाठी महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारणाचं वार्तांकन आणि विश्लेषण करणाऱ्या मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सुजाता आनंदन यांचे काल, बुधवारी रात्री नवी मुंबईत निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. आनंदन यांच्या आकस्मिक निधनामुळे वर्तमानपत्रातून सर्वसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा एक सच्चा पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना पत्रकारिता वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
आनंदन यांनी १९८०च्या दशकात आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीची सुरूवात केली. मुंबईमध्ये वार्तांकन करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा उदय आणि अस्त कसा झाला याचं नेमकं आणि सखोल विश्लेषण वर्तमानपत्रांमधून केलं होतं. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय या विषयांवरही भरपूर लिखाण केलं होतं.
सुजाता आनंदन या मूळच्या नागपूरच्या होत्या. त्यांनी नागपूर विद्यापीठातून बीएससी आणि बॅचलर ऑफ जर्नलिझमचं शिक्षण घेतलं होतं. १९८५ साली त्यांनी आपल्या पत्रकारिता करिअरची सुरूवात 'यूएनआय' या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून केली. १९९४-९८ दरम्यान आनंदन या दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या ‘आउटलूक’ या इंग्रजी साप्ताहिकात त्या १९९८ ते २००० या काळात दोन वर्ष सहायक संपादक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर २००० ते २०१६ या दरम्यान त्यांनी दैनिक ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीत राजकीय संपादक म्हणून काम केले होते. सध्या त्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या मुंबई निवासी संपादक म्हणून कार्यरत होत्या. धारदार लेखनी आणि घटना घडामोडींचे सखोल विश्लेषण यामुळे त्यांच्या बातम्या आणि लेख सर्वसामान्य वाचक आणि राजकीय वर्तुळात लोकप्रिय होते.
सुजाता आनंदन यांनी महाराष्ट्राचे राजकरण आणि समाजकारण या विषयावर दोन इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे - हाऊ शिवसेना चेंज्ड मुंबई फोरएव्हर’ आणि ‘महाराष्ट्र मॅक्झिमस - द स्टेट, इट्स पीपल अँड पॉलिटिक्स’ या दोन पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारणात घडलेल्या घटना घडामोडींवर भाष्य करत सखोल विश्लेषण आणि माहिती दिली आहे.
सुजाता आनंदन यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आणि मनाला चटका लावून गेले. आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या. सुजाता आनंदन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या