Mumbai Marathi patrakar sangh election : मुंबईतील पत्रकारांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत अखेर 'परिवर्तन' झालं आहे. २९ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलनं दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी समर्थ पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. संदीप चव्हाण हे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांच्या विजयामुळं पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील सर्वात जुनी पत्रकार संघटना असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक दर दोन वर्षांनी होते. यावेळी अनेक तरुण व अनुभवी पत्रकारांनी आपापल्या मागण्या हिरीरीनं मांडल्यामुळं ही निवडणूक चर्चेची ठरली होती. संदीप चव्हाण आणि सुकृत खांडेकर यांचं पॅनल अशी सरळ लढत होती. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलचं पारडं काहीसं जड दिसत होतं. प्रत्यक्षात तसंच झालं.
परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांना तब्बल ३१६ मतं मिळाली. तर, प्रतिस्पर्धी सुकृत खांडेकर यांना केवळ १६० मतांवर समाधान मानावं लागलं.
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत थोड्या फार प्रमाणात चुरस दिसली. मात्र, समर्थ पॅनलच्या उमेदवारांना विजयापर्यंत मजल मारता आली नाही. या निवडणुकीत राजेंद्र हुंजे आणि स्वाती घोसाळकर यांचा विजय झाला. त्यांनी उदय तानपाठक व विष्णू सोनवणे यांचा पराभव केला. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड निवडून आले. तर, कार्यवाहपदाच्या निवडणुकीत शैलेंद्र शिर्के यांनी बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत नाईक यांनी काम पाहिलं. तर, विजय तारी आणि हेमंत सामंत यांनी त्यांना सहाय्य केलं.
मुंबईतील अनेक श्रमिक पत्रकारांना हक्काचं घर नाही. हा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला होता. पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीनं त्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत अशा मागण्या अनेकांनी केल्या होत्या. तसंच, अनेक वर्षांपासून गंभीरपणे पत्रकारिता करणाऱ्या जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावं ही देखील मागणी होती. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता नव्या कार्यकारिणीला याचा पाठपुरावा करावा लागणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकी इतकीच यावेळी संघाची सर्वसाधारण सभा गाजली. यावेळी अनेक तरुण पत्रकार संघाच्या कारभाराची आधीच माहिती घेऊन तयारीनिशी सभेला आले होते. मागील काही वर्षांत झालेली सदस्य नोंदणी, कार्यक्रम वगैरेतील अनियमिततेवरून सदस्यांनी कार्यकारिणीला धारेवर धरले. ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, राजन चव्हाण, प्रकाश कुलकर्णी, प्रसाद मोकाशी यांनी अनेक मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले. अनेक बाबींची नोंद करून घेऊन यापुढं त्यात सुधारणा करण्याचं आश्वासन कार्यकारिणीनं दिलं. या सभेत संघाची घटना दुरुस्ती, डिजिटल मीडियासाठी निकष ठरवणे, डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी पुरस्कार सुरू करणे, निवडणूक आचारसंहिता असे अनेक ठराव आले. त्यातील काही मंजूर करण्यात आले तर काही समितीकडं पाठवण्याचा निर्णय झाला.
देवेंद्र भोगले (२८२), दिवाकर शेजवलकर (२८२), गजानन सावंत (२७४), आत्माराम नाटेकर (२७३), विनोद साळवी (२७२), किरीट गोरे (२४७), अंशुमान पोयरेकर (२४६), राजेश खाडे (२४५), राजीव कुलकर्णी (२३४)
कल्पना राणे (१८५), श्यामसुंदर सोन्नर (१७४), उमा कदम (१७२), रवींद्र भोजने (१६२), नंदकुमार पाटील (१६१), अरविंद सुर्वे (१४६), संतोष गायकवाड (१४२), विठ्ठल बेलवाडकर (११६), राजेंद्र साळस्कर (१०४), महेंद्र जगताप (९४), केतन खेडेकर (९२).