Pune Rape News: पुण्याबाहेरील ग्रामीण भागात १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी शाळेत 'गुड टच, बॅड टच' सत्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. शाळा प्रशासनाने याबाबत पीडिताच्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता शाळेत जात असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत तिच्या शरिराला अयोग्यरित्या स्पर्श केले. त्यानंतर पीडिता शाळेतून घरी परतत असताना आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, शनिवारी ‘गूड टच, बॅड टच' सत्रादरम्यान पीडिताने तिच्यासोबत घडलेला प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात बीएनएस आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा येथे एका निर्जन स्थळी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नालासोपाऱ्यात वारंवार येत असे. दोन आठवड्यांपूर्वी तिची ओळख तिच्या मित्राच्या घराशेजारील स्टुडिओत फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या सोनू नावाच्या एका आरोपीशी झाली. आरोपी आणि तरुणी गप्पा मारू लागले आणि फोन नंबरची देवाणघेवाण करू लागले. शुक्रवारी सोनूने मुलीला नालासोपाऱ्यात बोलावून बाहेर फिरायला घेऊन जायचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मुलगी नालासोपाऱ्यात त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आली होती.सोनूने तिला ज्या ठिकाणी भेटण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणाहून उचलले आणि आजूबाजूला कोणीही नसताना तिला आपल्या स्टुडिओमध्ये आणले. त्याने दरवाजा बंद करून मुलीकडे लैंगिक संबंधांची मागणी करण्यास सुरुवात केली, तिने नकार दिला आणि तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला. ती निघण्याच्या तयारीत असताना दुसरा आरोपी रिक्षा चालवत सोनूच्या स्टुडिओबाहेर आला. सोनूने मुलीला थांबवून रिक्षात ढकलले आणि जबरदस्तीने नगीनदास पाडा येथील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.