Madhukar Pichad Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबर रोजी राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मधुकर पिचड यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी दुजोरा दिला. मधुकर पिचड यांचे आज (शुक्रवार) साडेसहा वाजता नाशिक येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांचे मूळ गाव राजुर येथे शनिवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. मधुकरराव पिचड महाविद्यालयात नागरिकांना अंतदर्शनासाठी पिचड यांचे पार्थिव ठेवले जाईल. मग दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वैभव पिचड यांनी दिलीय.
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे. मधुकर पिचड यांनी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. त्यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही भुषवले होते. त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. १९७२ साली अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९७२ ते १९८० या काळात ते पंचायत समितीवर सभापती म्हणून कार्यरत होते. १९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, त्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संबंधित बातम्या