kim jong un : उत्तर कोरियाने आता आपला शेजारी आणि शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियाला विचित्र पद्धतीने त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कचरा आणि मलमूत्राने भरलेले फुगे उत्तर कोरियातून दक्षिण कोरियाच्या राज्यांमध्ये पाठवले जात असल्याची माहिती आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात असे फुगे पाठवले होते. आता पुन्हा शनिवारपासून उत्तर कोरियाने पुन्हा कचरा आणि मलमूत्राने भरलेले फुगे दक्षिण कोरियात सोडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोलसह अनेक शहरांतील रहिवाशांना या बाबत सतर्क केले आहे. या प्रकारच्या कोणत्याही फुग्यामध्ये रासायनिक शस्त्रे किंवा कोणतीही स्फोटक सामग्री असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने हे फुगे दिसल्यास तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने उत्तर कोरियाकडून पाठवण्यात येणाऱ्या फुग्यांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शनिवारी रात्रीपर्यंत, अधिकाऱ्यांना राजधानी सेऊल आणि जवळील ग्योन्गी प्रांतात कचरा आणि मलमूत्राने भरलेले सुमारे ९० फुगे सापडले होते, असे योनहाप वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे. या फुग्यांमध्ये कागद, प्लास्टिकचा कचरा आणि सिगारेटचे बुटके होते. अनेक फुग्यांमध्ये मलमूत्र आणि कचरा सापडल्याची माहितीही समोर आली आहे.
सैन्याने लोकांना हवेतून येणाऱ्या या फुग्यांपासून व त्यातून पडणाऱ्या वस्तूंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर कोरियाकडून येणाऱ्या संशयास्पद वस्तूंना स्पर्श न करण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे. असे फुगे दिसल्यास लष्करी किंवा पोलिस कार्यालयांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला दुखापत किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. सोलमधील सरकारने चेतावणी दिली की अज्ञात वस्तू, उत्तर कोरियामधून आल्याचा संशय आहे, शहराच्या आकाशात दिसले आहेत आणि सैन्य त्यांच्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे देखली सांगण्यात आले आहे.