Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागितली. 'मी आयुष्यात कधीही कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय कारणास्तव वाद निर्माण करण्यात आला, असे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिलांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि जाहीर माफी मागतो.
पुढे अरविंद सावंत म्हणाले की, 'माझ्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात मी कधीही महिलांचा अपमान केलेला नाही. माझ्या वक्तव्याचा राजकीय कारणांसाठी वाद निर्माण करण्यात आला. मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, याचे मला वाईट वाटते. मी २९ ऑक्टोबर रोजी असे वक्तव्य केले, पण विरोधकांना १ नोव्हेंबरला आठवले', असेही सावंत म्हणाले. 'याआधी इतर राजकीय नेत्यांनी महिलांना 'जर्सी गाय' आणि 'शूर्पणखा' असे संबोधले. त्यांच्याविरोधात कोणती कारवाई झाली. हे वक्तव्य महिलांचे सन्मान करणार आहेत का? राज्याच्या एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावेळी कोणती कारवाई झाली?' असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. अमिन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले. शायना एनसी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत अरविंद सावंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आणि निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण इथे इम्पोर्टेड माल चालत नाही. आमच्या येथे ओरिजनल माल चालतो', असे अरविंद सावंत म्हणाले.
अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. 'अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते. मुंबादेवी येथील प्रत्येक स्त्री माल आहे, असे त्यांना वाटते का? हे लोक एखाद्या महिलेचा सन्मान करू शकत नाहीत. म्ही सक्षम स्त्रीला राजकारणात माल म्हणता. तुम्ही एका महिलेला माल म्हटले आहे. मी या प्रकरणी कारवाई करू किंवा नाही, पण याचे उत्तर जनता त्यांना नक्कीच देईल. हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचार केला होता. पण त्यांची मनःस्थिती, विचार आणि कल्पनाच आहे की ते स्त्रीला माल म्हणत आहेत.' यानंतर शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.