Bopdev Ghat Rape Case : पुण्यात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांना पुन्हा यश आले असून या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून पोलिस त्याच्या मागावर असून लवकरच त्याला सुद्धा अटक केली जाण्याची शक्यता आहे.
अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या आधी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) या आरोपीला अटक केली आहे. त्याला (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेख, कनोजिया व त्यांच्या तिसरा संधिदार फरार आहे. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या एका तरुणीला व तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांना आधी लुटण्यात आलं. त्यानंतर मुलाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपी फरार झाले होते. घटना घडल्यापासून तब्बल ९ दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.
पुणे पोलिसांच्या ६० पेक्षा अधिक पथकांनी बोपदेव घाट परीसारात चौकशी करत ७००पेक्षा अधिक सीसीटीव्ही व ४०० पेक्षा जास्त गुन्हेगारांची झडती घेतली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील घाट तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना एका आरोपीला अटक करण्यात यश आलं. १० ऑक्टोबर येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर इतर आरोपींचा पोलिस शोध घेत होते. आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. त्यांनी शेख ला सापळा लावून अटक केली आहे. आरोपी शेखचे ३ लग्न झाले असून त्याची पत्नी प्रयागराज परिसरात वास्तव्यास आहे. शेख घटनेनंतर नागपूरमार्गे उत्तर प्रदेशात पसार झाला. तो कोढव्यातील एका भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे काम करत होता.