Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी; धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरी, काहींचा श्वास गुदमरला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी; धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरी, काहींचा श्वास गुदमरला

Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी; धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरी, काहींचा श्वास गुदमरला

Jul 04, 2024 11:13 PM IST

team india Victory Parade : मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत प्रचंड गर्दी केली होती. वानखेडे स्टेडियमबाहेर चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. चर्चगेटवर झालेल्या गर्दीने काहींचा श्वास गुदमरला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची आज क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विजयी परेड करण्यात आली.विश्वविजेता टीम इंडियाचे टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मुंबईत आगमन झालं. आपल्या विजयीवीरांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी आज मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत प्रचंड गर्दी केली होती. वानखेडे स्टेडियमबाहेर चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी लोक मरीन ड्राईव्हवर येत असल्याने चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत काहींचा श्वास कोंडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णावाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वानखेडे स्टेडियमच्या गेट नंबर२च्या बाहेरही क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी,वाहतूक पोलीस गर्दीत अडकल्यावर अस्वस्थ झालेल्या तरुणीला खांद्यावरून उचलून नेताना दिसत आहेत. याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. परेड मार्गावर गर्दीचे नियमन करताना काही ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश -

मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड संख्यने जमलेल्या क्रिकेटप्रेमींची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे नियंत्रण करण्याचे निर्देशही त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. विश्वविजेत्या संघाच्या स्वागतासाठी नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान मोठी गर्दी झाली होती. मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडिमच्या बाहेरतर चेंगरीचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

वानखेडे स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी -

मुंबईतील वरळी ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजय रॅली काढण्यात आली. यातच आज चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. या स्टेडियमची क्षमता ३५ ते ४० हजार इतकी असताना त्यापेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी आतमध्ये उपस्थित होते. जितके चाहते हे स्टेडियमच्य आतमध्ये होते त्यापेक्षा अधिक स्टेडियमच्या बाहेर व रस्त्यांवर होते.

अनेक लोक वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे वानखेडेच्या गेट नंबर २ येथे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी गर्दी नियंत्रित आणण्यासाठी सौम्य लाठीमार केला. वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी स्टेडिअमची सर्व गेट बंद केले.

 

मुंबईत नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून ही विजय रॅली काढण्यात आली. भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यांवर प्रचंड जनसागर लोटला होता. मुंबईत पाहावं तिथं लोकांची गर्दी दिसत होती. पावसाची रिमझिम सुरू असतानाही लोक मुंग्यासारखे रस्त्यांवरून दिसत होते. भारतानं तब्बल १७ वर्षानंतर टी २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी २००७ मध्ये टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाच पहिलाच टी २० वर्ल्डकप जिंकला होता.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर