हवामान विभागाने गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईसह, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या (गुरुवारी २६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या ५ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून सकाळपर्यंत मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु असून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे.
मुंबई तसेच उपनगरे, ठाणे, पुण्यात पावसाचा जोर दिसत असून हवामान विभगाने या भागात गुरुवारीही देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुणे, पालघर आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. मुंबई, उपनगरासह ठाणे जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. बुधवारी झालेल्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे नोकरदार वर्गासह, शालेय विद्यार्थी आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भारतीय हवामान विभागाने उद्या (२६ सप्टेंबर) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. या रेड अलर्टमुळे नागरिकांनी अनाश्यक घराबाहेर पडणं टाळावं, असे आवाहन प्रशासनानं दिलं आहे.
२६ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ नये तसेच आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी मुंबई व ठाणे शहरात महापालिकेच्या व खासगी शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भारतीय हवामानविभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. पुण्याला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. रस्त्यांना नद्याचं रुप आल्याने अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पालघर जिल्ह्याला गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट तर त्यानंतर दिवसभर ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मागील दोन तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचले आहे.
बुधवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबून राहिल्या. तसेच पश्चिम मार्गावर जलद लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे अनेक मुंबईतील सर्वच स्टेशनवर लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळते आहे. कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे.
येत्या चार दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने ठाण मांडल्याचे दिसत आहे. मुंबईला परतीच्या पावसाने जोरदार तडाका दिला असून मुंबईत भयंकर पाऊस पडत असून रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर उद्या दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुंबईसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ऑरेंज अलर्ट असणार आहे.