Pune schools closed today due to rain : हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे आज पहाटे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी ४ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २२८८० क्युसेक्स विसर्ग वाढवून तो ४० हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. आज सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नदीपत्रालगत असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.
पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना ओढ्या नाल्यांना पुर आल्याने व धरणातील पाणी वाढणल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
पुण्यात पुढील काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांत पुण्यात व घाट विभात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या तुकडीला देखील तैनात करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. काही इमारतीचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. भर पाण्यात येथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. येथील एकता नगर परिसरात नदीचे पाणी घुसले आहे. तर सहा सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. तब्बल २०० नागरिक येथे अडकले असून महापालिका , पोलीस गायब असल्याने व मदतीसाठी कोणतीही यंत्रणा नअसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना पूर्व सूचना दिली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
🔴भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
🔴गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
🔴शितळा देवी मंदिर डेक्कन.
🔴संगम पूल पुलासमोरील वस्ती
🔴कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
🔴होळकर पूल परिसर
संबंधित बातम्या