Kalyan Student suicide : कल्याण येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ८ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली आहे. मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटदेखील लिहली असून यात त्याने शाळेतील शिक्षिका व काही मुले त्रास देत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचं लिहिलं आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विघ्नेश पात्रो (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. विघ्नेश हा कल्याण पूर्व येथील आयडियल शाळेत ८ वीत शिकत होता. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलत असल्याचं त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.
विघ्नेश पात्रो हा त्याच्या आई वडिलांसह कल्याणमधील चिकणीपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील हे प्रमोदकुमार पात्रा रविवारी कामावर गेले होते तर विघ्नेशची आई पत्नी व मुलगी हे दोघीही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी त्याने छताला गळफास घेत जीवन संपवलं. त्याचे वडील घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी विघ्नेशला आवाज दिला मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी घराची खिडकीतून आत पहिले असता, विघ्नेशने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. यामुळे त्याच्या वडिलांनी टाहो फोडला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावत आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.
पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. त्यांनी मुलाने लिहिलेली सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे. यात त्याने शाळेतील शिक्षिका आणि काही विद्यार्थी त्रास देत असल्याचं लिहिलं आहे. या सोबतच त्याने 'पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करत आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस सुसाइड नोटमध्ये लिहिलेल्या शिक्षिकेचा तपास करत आहेत.