मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune leopard attack : पुणे जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला; शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

Pune leopard attack : पुणे जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला; शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

Jun 23, 2024 06:21 AM IST

Pune leopard attack : पुणे जिल्ह्यात मानव बिबट्या संघर्ष वाढला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यात दहिवडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत.

पुणे जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला; शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार
पुणे जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला; शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

Boy died in leopard attack in Pune shirur taluka dahivadi village : पुणे जिल्ह्यात मानव बिबट्या संघर्ष वाढला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यात दहिवडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. जुन्नर तालुक्यात गेल्या महिन्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना शिरुर तालुक्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिक दहशतीत आहेत. मृत यश सुरेश गायकवाड (वय ११) हा पाचवीत शिक्षण घेत होता. तर तो त्यांच्या आई वडिलांसोबत दहिवडी गावातील देवमळा परिसरात राहायला आहे.

आज सकाळी तो नैसर्गिक विधीसाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला होता. मात्र, तो बराच वेळ झाला, तरी घरी परतला नाही. यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. दरम्यान, त्याच्या आई वडिलांनी व कुटुंबीयांनी तसेच काही ग्रामस्थांनी यशचा आजूबाजूला शोध घेतला. यावेळी यश उसाच्या फडात मृतावस्थेत सापडला. त्याच्या शरीराचा काही भाग बिबट्याने खाल्ला होता. दरम्यान, हा हल्ला बिबट्याने बिबट्याने केल्याचे उघड झाल्यानंतर दहिवडी गावावर शोककळा पसरली. या सोबतच येथील नागरिकांत दहशत देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

दहिवडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला

गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यातील दहिवडी गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागात दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन होते. या भागात दाट झाडी, उसाचे फड असल्याने बिबट्यासाठी लपण्याची ठिकाणे भरपूर आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली असून ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार या ठिकाणी सहा पिंजरे व ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच बिबट्याच्या शोध घेण्यासाठी ड्रोनची देखील मदत घेलती जाणार आहे. बिबट्याच्या पावलांचे ठसे घेण्यात आले असून यशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालाद्वारे मिळेल, असे जगताप म्हणाले.

बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू

शिरुर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावरामुळे शिरुर तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत असून त्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

WhatsApp channel
विभाग