savitribai phule pune university recruitment : सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात बऱ्याच वर्षांनंतर प्राध्यापक भरती केली जाणार आहे, तब्बल १११ प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे, ही भरती पूर्णवेळ पदासाठी केली जाणार आहे. या साठी १ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हा अर्ज करता येणार आहे. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त असलेल्या २१५ पैकी १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. या बाबतची जाहिरात पुणे विद्यापीठ प्रशासाने शनिवारी प्रकाशित केली. प्राध्यापकांच्या जागांसह विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही पदभरती केली जाणार आहे. याची देखील जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे तब्बल २१५ जागा या रिक्त आहेत. पूर्णवेळ प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त होत्या, काही विभागांत केवळ एक किंवा दोन पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत आहेत. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिमाण होत होता. त्यामुळे विद्यापीठाने १३३ प्राध्यापकांना कंत्राटी तत्वावर नेमले होते. मात्र, ही होणारी भरती पूर्ण वेळ होणार असल्याने पात्र उमेदवारांनी ३१ जानेवारीपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे असे आवाहंन करण्यात आले आहे.