Savitribai Phule Jayanti : 'महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे देशाला लाभलेलं वरदान आहे. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन अफाट अशा सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. सावित्रीबाई नसत्या तर समाज ५० वर्षे मागे गेला असता, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार व सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं खंडाळा तालुक्यातील नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंती सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 'लोकांनी या ठिकाणी वर्षभर यावं आणि सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी सरकार इथं दहा एकर जागा खरेदी करून आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी खर्चून भव्य स्मारक उभारेल, अशी घोषणा त्यांनी केली. सावित्रीबाई फुले यांचं कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असा शब्द त्यांनी दिला.
'महिला अबला नसून सबला आहेत ही जाणीव स्त्री शिक्षणातून निर्माण करण्याचं कार्य सावित्रीबाईंनी केलं. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. हा इतिहास जतन करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'आज भारतीय नौदलातील युद्धनौकेचं नेतृत्व मराठी महिला करत आहे. लढाऊ विमानं महिला चालवत आहेत. त्यांचा अभिमान आपल्याला असून या सर्वांच्या मूळ प्रेरणास्त्रोत सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी डोंगराएवढं काम केलेलं आहे. सावित्रीबाई नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचं काम त्यांनी केलं आहे. अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं. प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचं ही शिकवण त्यांनी दिली. फुले दाम्पत्याचं कार्य इतकं मोठं होतं की हे कार्य पाहून त्यांना मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांचं देखील मतपरिवर्तन झालं. फुले दाम्पत्य हा आपला अभिमान आहे. त्यांच्या कार्याचं स्मरण पुढच्या हजारो पिढ्यांना राहावं यासाठी भिडे वाड्यात मोठं स्मारक उभं करण्यात येत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.