आता तर हद्दच झाली..! सावरकरांसाठी महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई-अहिल्यादेवीचे पुतळे हटवले, भाजप सरकारवर टीकेची झोड
Savitribai and ahilya devi statue removed :सावरकरांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने त्यांना आदरांजली वाहिली. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री आज दिल्लीत आले होते. महाराष्ट्र सदनातील वीर सावरकरांच्या पुतळ्याला सर्वांनी नमन केले.
सावरकरांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही.
हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे,त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.