मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसंवाद यात्रेला हिंदू गर्व गर्जना यात्रेनं उत्तर; राज्यभरात शिंदेंच्या शिलेदारांची जोरदार तयारी

शिवसंवाद यात्रेला हिंदू गर्व गर्जना यात्रेनं उत्तर; राज्यभरात शिंदेंच्या शिलेदारांची जोरदार तयारी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 19, 2022 03:07 PM IST

Hindu Garv Garjana Yatra: एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार साताऱ्यात पुरुषोत्तम जाधव यांनी हिंदू गर्व गर्जना यात्रेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Purushottam Jadhav
Purushottam Jadhav

Hindu Garv Garjana Yatra: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटानं हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेची जोरदार तयारी जिल्ह्याजिल्ह्यात सुरू असून साताऱ्यात यात्रेची धुरा शिंदे गटाचे शिलेदार व तरुण तडफदार नेते पुरुषोत्तम जाधव (Purushottam Jadhav) यांच्या खांद्यावर आहे. यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेत बंड करून राज्यात भाजपच्या साथीनं सरकार आणणारे एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक बंडखोर आमदार सध्या शिवसेनेच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरून बंडखोर गटाविरोधात रान उठवत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा आम्हीच पुढं नेत आहोत हे ठसविण्यासाठी शिंदे गटानं ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे.

साताऱ्यात पुरुषोत्तम जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. २० सप्टेंबर ते शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही यात्री निघणार आहे. यात्रेची सुरुवात २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज सांस्कृतिक भवन कोरेगाव रोड सातारा येथून होणार आहे. शिंदे गटाचे मंत्रीही ठिकठिकाणच्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. साताऱ्यातील यात्रेचा शुभारंभ उद्योग मंत्री उदय सामंत व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील काही वर्षांत शिवसेनेनंही इथं जम बसवला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम करणारे खंदे शिलेदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळं त्यांनी आता अधिक जोमानं काम सुरू केलं आहे. यात्रेच्या माध्यमातून त्यांना शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, जाधव यांनी यात्रेची तयारी केली आहे. सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, जिल्हा महिला संघटिका शारदाताई जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रणजीत भोसले हे देखील यात्रेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग